वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात, आणि हे करणार्‍या व्यक्तीला कीर्तनकार. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायांत कीर्तन हा प्रकार आढळतो.नवविधा भक्तीपैकी कीर्तन हा दुसरा प्रकार आहे.

महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. येथे होणार्‍या कीर्तनांत नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन असे दोन मुख्य प्रकार आहेत. नारद हा भारतातील आद्य कीर्तनकार आहे, असे मानले जाते.

भारतवर्षात नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते महर्षी व्यासांस शिकवले, व्यास महर्षींनी शुकास शिकवले आणि पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला, अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते.

वस्तुतः 'श्रीहरिकीर्तन' खेड्यापाड्यात पोहोचले आहे. सर्व लोकांना ईशभक्तीमध्ये रममाण करणे हा कीर्तनाचा उद्देश आहे.
अनेक कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनांनी शिवाजी महाराजांच्या काळात व ब्रिटिशांच्या काळात लोकजागृतीचे काम केले. [१] गोव्यात जीवन्मुक्त महाराजांनी पोर्तुगीजविरुद्ध कीर्तानातून क्रांती केली.