अष्टांग योग संशोधन व अभ्यास केंद्र

मनोविकार मुक्त व शारीरिक व्याधी विरहित जीवन जगण्यासाठी योगशास्त्र हे भारतीय प्राचीन संस्कृतीने अखिल मानवी जातीला दिलेले सर्वात मोठे वरदान आहे. योग म्हणजे मनाचा आपल्या जीवाशी संयोग घडवून आणणे होय. अष्टांग योग राजयोग ही योगशास्त्र शिकवण्याची प्रयोगशाळा आहे. यम नियम ,आसन प्राणायाम ,प्रत्याहार ,धारणा ,ध्यान आणि समाधी ही ती आठ अंगे आहेत.
आज आपण वेगवेगळ्या शारीरिक कसरतीलाच योग म्हणू लागलो आहोत यामुळे योगशास्त्र विषयी अनेकच संभ्रम निर्माण होऊ लागलेले आहेत. शरीर ज्या सूक्ष्म तत्त्वापासून बनलेले आहे त्याच सूक्ष्म तत्त्वांपासून मन हे बनलेले असल्यामुळे शरीर रोगी झाले तर मन सुद्धा आजारी पडते आणि मन आजारी पडले तर शरीर सुद्धा आजारी पडते. आपण निरोगी आहात की रोगी हे सर्वस्वी मनाच्या अवस्थेवर अवलंबून असते.
शरीर व मन स्थिर झाल्याशिवाय आपण शारीरिक व्याधी पासून मुक्ती मिळू शकत नाही आणि मानसिक विकारापासून सुद्धा मुक्ती मिळवू शकत नाहीत. हे मनाचे शास्त्र असल्यामुळे केवळ शारीरिक कसरती कलाकौशल्य म्हणजे योगशास्त्र होत नाही. योगशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला यम नियम या आठ अंगाचा अभ्यास करावा लागेल.