Vishwa Vishal NEWS

राजकीय,सामाजिक,प्रशासकीय,कला,क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी विश्व विशाल न्यूज ला सबस्क्राईब करुन बेलआयकॉन ला नक्कीच क्लिक करा.


Vishwa Vishal NEWS

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यानंद बापट यांनी डीजेच्या दणदणाटाविरोधात आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात उठवलेला आवाज, तद्वतच त्यावर सुरू झालेली व्यापक सामाजिक चर्चा नक्कीच अत्यंत महत्त्वाची आहे.
लाऊडस्पीकर आणि डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुलांना, वृद्धांना आणि रुग्णांना होणारा त्रास तसेच आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम यावर आज गल्लीबोळापासून दिल्लीपर्यंत सर्वत्र चर्चा चालू आहे आणि सोशल मीडियावरही भरपूर उहापोह चालू आहे.
उत्सव कोणताही असो कोणत्याही धर्माचा असो, सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला प्राथमिकता ही मिळालीच पाहिजे.
या संपूर्ण गदारोळात आणि आरोग्याच्या चर्चेत आपण एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाला सोयीस्करपणे विसरतोय, तो म्हणजे याच डीजेच्या थेट समोर सलग १२-१२ तास कडक ड्युटीवर उभा राहणारा खाकी वर्दीतील पोलीस.
नागरिक म्हणून आपण डीजेच्या तालावर काही वेळ नाचतो किंवा त्रास झाला तर घराची दारेखिडक्या लावून आत निघून जातो. पण तासंतास त्या ९० ते १०० डेसिबलपेक्षा जास्त तीव्रतेच्या आवाजात, थेट स्पीकरच्या अवघ्या काही मीटर अंतरावर उभे राहून गर्दी नियंत्रित करणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याचं काय, यावर कोणीच बोलताना दिसत नाही.
कोरोना काळात याच फ्रंट लाइन वॉरियर ला आपण सॅल्यूट करत होतो त्यांच्या आरोग्याविषयी बोलत होतो. पण मग नंतर त्यांच्या आरोग्यासाठी विशेष अश्या काही चर्चा होताना दिसल्या नाही. आपल्याकडे डॉक्टर्स, पोलिस हे २४ तास ड्यूटीवर असतात असे म्हंटले तरी काही वावगे ठरणार नाही. पण आता ह्यांच्या आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर आहेत.
डीजेच्या थेट संपर्कात दिवस-रात्र ड्युटी केल्यामुळे अनेक पोलिसांना अनेक विकारांना सामोरे जावे लागते. डीजेच्या अति-कंपनांचा थेट परिणाम पोलिसांच्या रक्ताभिसरणावरही होतो, ज्यामुळे उच्च रक्तदाब, छातीत धडधडणे आणि मानसिक तणाव यांसारख्या समस्या उद्भवतात.
दुर्दैवाने, अशा ध्वनीप्रदूषणाच्या महापुरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे कोणतेही ध्वनी-रोधक 'इअर प्लग्स' किंवा विशेष सुरक्षा साधने उपलब्ध नसतात. कानाचे पडदे फाडणाऱ्या या आवाजातही स्वतःचे आरोग्य पणाला लावून ते केवळ आपली कर्तव्यनिष्ठा पार पाडत असतात.
पोलीस कर्मचाऱ्यासाठी सण-उत्सव हा आनंदाचा काळ नसून कौटुंबिक सुट्ट्या गमावून अतिरिक्त ड्युटी करण्याचा कठीण काळ असतो. गणपती संपतो ना संपतो तोच नवरात्र, पाठोपाठ येणारी दिवाळी, इतर धर्मांचे सणसमारंभ, निवडणुका, मोर्चे, आंदोलने आणि (नागपूरचे हिवाळी) अधिवेशन... अशा रीतीने वर्षाचे ३६५ दिवस पोलीस कर्मचारी सतत तणावाच्या छायेत आयुष्य जगत असतात. कडक उन्हात, धो-धो पावसात किंवा प्रचंड गर्दीत सलग १२ ते १६ तास उभे राहिल्याने पोलिसांमध्ये 'व्हेरिकोज व्हेन्स'सारखे गंभीर आजार उद्भवतात, ज्यामध्ये पायांच्या शिरा फुगून असह्य वेदना होतात. वेळेवर जेवण न मिळणे, अपुरी झोप आणि वाढता मानसिक ताण यांमुळे डायबेटिज, ॲसिडिटी आणि हृदयविकार त्यांच्या आयुष्याचा भाग बनून जातात.
एकीकडे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची ही बिकट अवस्था असताना, दुसरीकडे समाज म्हणून आपण त्यांना कसली परतफेड देतोय, हा एक गंभीर प्रश्न आहे. आजकाल ट्रॅफिक पोलिसांना मिळणारी वागणूक अत्यंत चिंताजनक आणि संतापजनक आहे. सिग्नल तोडणाऱ्याला थांबवले किंवा नियमांचे पालन सांगण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांशी उद्धटपणे भांडणे आणि धमकी देणे ही रोजचीच बाब झाली आहे. त्याहूनही भयानक म्हणजे आजकाल स्वतःची चूक लपवण्यासाठी पोलिसांच्या अंगावर थेट गाड्या घालण्यापर्यंत आणि त्यांना फरफटत नेण्यापर्यंत लोकांची मजल गेली आहे. ज्या पोलिसांमुळे रस्ते सुरक्षित राहतात, त्यांच्याच जिवावर बेतेल अशी वागणूक देणे ही समाजाची दुर्दैवी मानसिकता दर्शवते.
जे लोक स्वतःच्या सुखाचा, झोपेचा आणि सणांचा त्याग करून रात्रंदिवस रस्त्यावर उभे राहतात, आपल्या सुरक्षेसाठी अहोरात्र प्रयत्न करतात, त्यांनाच आपण नकळत आणि सर्रास 'व्हिलन' बनवून मोकळे झालो आहोत.
पोलीस आपल्यासारखीच रक्तामांसाची माणसे आहेत. त्यांनाही आजारपण येतं, थकवा जाणवतो आणि घरी त्यांचीही मुले-बाळे, आई-वडील वाट पाहत असतात. नियमांची अंमलबजावणी करणे हा त्यांचा गुन्हा नसून ती त्यांची जबाबदारी असते, आणि ते नियम पाळणे ही आपली जबाबदारी आहे हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो.
त्यामुळे बापट यांच्या निमित्ताने डीजेच्या आवाजावर, ध्वनीप्रदूषणावर आणि नागरिकांच्या आरोग्यावर सुरू झालेली ही चर्चा अधिक व्यापक व्हायला हवी. या चर्चेच्या केंद्रस्थानी अपुऱ्या साधनांसह रस्त्यावर उभा असलेला 'खाकी' वर्दीतील पोलीसही असायला हवा. वाहतुकीचे नियम पाळणे, पोलिसांशी नम्रतेने बोलणे आणि त्यांच्या कामाचा आदर करणे हे त्यांच्यावर केलेले उपकार नसून ते आपले मूलभूत कर्तव्य आहे. सण-उत्सवाच्या काळात स्वतःचे आरोग्य पणाला लावणाऱ्या या रक्षकांना 'व्हिलन' ठरवणे थांबवून, त्यांना एक माणूस म्हणून आणि सुरक्षेचा मुख्य आधार म्हणून सन्मान देणे हेच खऱ्या अर्थाने सुजाण समाजाचे लक्षण ठरेल.
सण संपतील, डीजे शांत होतील... पण 'तालावर जग आणि ताणावर खाकी' हे विदारक चित्र कधी बदलणार? पोलिसांना 'व्हिलन' ठरवणं थांबवून, त्यांना एक माणूस म्हणून आणि सुरक्षेची मुख्य ढाल म्हणून स्वीकारायची हीच योग्य वेळ आहे. चला, या उत्सवात डीजेचा गोंगाट थोडा कमी करूया आणि आपल्या रक्षकांना सन्मानाची भेट देऊया. कारण डीजेचा 'बेस' थोडा कमी झाला तरी चालेल, पण खाकीचा 'सन्मान' कमी होता कामा नये!

3 weeks ago |[YT] | 8

Vishwa Vishal NEWS

धाराशिव जिल्ह्यात खळबळ! वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या कथित जाचाला कंटाळून कनिष्ठ पुरुष कर्मचाऱ्याची आत्महत्या?

मानसिक छळ, अपमानास्पद वागणूक आणि वेतनाबाबत अडवणुकीचे गंभीर आरोप; प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा कुटुंबीयांचा संशय — निष्पक्ष चौकशीची मागणी

धाराशिव : जिल्ह्यातील एका शासकीय कार्यालयाशी संबंधित धक्कादायक प्रकरण सध्या चर्चेत आले असून, वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याच्या कथित जाचाला कंटाळून एका कनिष्ठ पुरुष कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, संबंधित कर्मचाऱ्याच्या मृत्यूमागील नेमकी कारणे काय आहेत, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कनिष्ठ कर्मचाऱ्याला कार्यालयीन कामकाजादरम्यान कथितरीत्या वारंवार अपमानास्पद बोलणे, मानसिक त्रास देणे, जाणूनबुजून त्रासदायक परिस्थिती निर्माण करणे तसेच वेतनाशी संबंधित बाबींमध्ये अडचणी निर्माण केल्याचे आरोप करण्यात येत आहेत. या कथित त्रासाला कंटाळून संबंधित कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर संबंधित कुटुंबीयांना संपूर्ण वस्तुस्थिती समजून घेण्याऐवजी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे प्रकरण अंतर्गत पातळीवर हाताळण्याचा प्रयत्न झाला का, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

मृत कर्मचाऱ्याला न्याय देण्याची जबाबदारी असतानाही संबंधित अधिकारीच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असतील, तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणत्याही दबावाला बळी न पडता स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.

या प्रकरणातील आरोप अद्याप अधिकृत चौकशीत सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे संबंधित महिला अधिकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच कार्यालयाची अधिकृत बाजूही समोर येणे आवश्यक आहे. आत्महत्येमागील वास्तविक कारणे, कार्यालयातील वातावरण, संबंधित कर्मचाऱ्याच्या तक्रारी, वेतनाशी संबंधित कागदपत्रे आणि उपलब्ध पुरावे यांची तपासणी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी होत आहे.

आता खरा सवाल हा — वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे हे प्रकरण दडपले जाणार, की मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी निष्पक्ष चौकशी होणार?

या प्रश्नाचे उत्तर आता धाराशिव जिल्ह्यातील प्रशासनाला आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहे.

1 month ago |[YT] | 1

Vishwa Vishal NEWS

आईच्या कुशीतलं पहिलं अमृत


दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत जगभरात 'जागतिक स्तनपान सप्ताह' साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि 'वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ॲक्शन' (वाभा) यांच्या पुढाकाराने १९९२ पासून हा सप्ताह पाळला जातो. आई आणि बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने स्तनपानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवणे हा त्याचा मुख्य उद्देश. यंदाही जगभरातील १७० हून अधिक देशांमध्ये हा सप्ताह उत्साहात साजरा केला जात आहे.
दरवर्षी एक नवीन संकल्पना आणि उद्दिष्ट घेऊन हा ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ साजरा केला जातो. यंदाची, २०२६ ची संकल्पना “आयुष्याच्या शाश्वत सुरुवातीसाठी स्तनपान: जे प्रभावी आहे ते अधिक बळकट करूया”, अशी आहे. ही संकल्पना केवळ जनजागृतीपुरती मर्यादित न राहता, आजपर्यंत ज्या उपक्रमांना प्रत्यक्षात यश आले त्यांचा विस्तार करण्यावर, त्या उपक्रमांच्या परिणामांचा माग घेऊन ती धोरणे अधिक सक्षम करण्यावर आहे. सरकार, आरोग्य यंत्रणा, कार्यालये, समाज आणि कुटुंबांनी एकत्र येऊन स्तनपानासाठीची 'आधाराची साखळी' म्हणजेच “वॉर्म चेन ऑफ सपोर्ट” अधिक मजबूत करावी, असे आवाहनही याद्वारे करण्यात येत आहे.
भारतासारख्या देशात आईचे दूध हे अमृताप्रमाणे असते. पण असे असतानाही, आपल्याकडे जे सर्वेक्षण होतात त्यातील आकडे काही वेगळेच चित्र रेखाटत आहेत. नुकत्याच मे २०२६ मध्ये प्रकाशित झालेल्या “नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-६”(२०२३-२०२४) च्या आकडेवारीत भारतातील शहरी भागात “इंस्टीटूशनल बर्थ रेट” ९५.२% आणि ग्रामीण भागात ८९% एवढा दिसून येतोय. हा आकडा सुखावणारा असला तरी मात्र पहिल्या एक तासाच्या आत स्तनपान मिळालेल्या मुलांचा आकडा मात्र शहरी भागात ४८% आणि ग्रामीण भागात ५०.८% एवढा आहे. महाराष्ट्रातील चित्रही साधारण असेच आहे. आपल्याकडे “इंस्टीटूशनल बर्थ रेट” ९८.५% शहरी भागात तर ९५% ग्रामीण भागात दिसतो. पण एक तासाच्या आत आईचे दूध मिळालेल्या मुलांचा आकडा शहरी भागात ५१% आणि ग्रामीण भागात ५४.७% असा आहे. त्यासोबत पहिले सहा महिने फक्त आईचे दूध घेणारी मुलं शहरी भागात ५२.८% आणि ग्रामीण भागात ७५.२% असे आहेत. ह्या आकड्यांवरून अजूनही आपल्याला खूप मोठा टप्पा पार करण्याची गरज आहे हे दिसून येते.
अनेकदा अपुरी माहिती, सामाजिक गैरसमज, कामाच्या जागेवरील सुविधांचा अभाव आणि आरोग्य यंत्रणेतील त्रुटी यांमुळे मातांना योग्य वेळी योग्य पद्धतीने स्तनपान करता येत नाही. हा असमतोल दूर करून, प्रत्येक आईला तिच्या स्तनपानाच्या प्रवासात योग्य आधार मिळाला पाहिजे. त्यासाठी जनजागृती मोहिमा, आरोग्य शिबिरे, समुपदेशन सत्रे आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित करून स्तनपानाकडे केवळ 'वैयक्तिक निवड' म्हणून नव्हे, तर 'सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न' म्हणून पाहण्याची दृष्टी समाजात रुजवली पाहिजे.
आपल्याकडे बाळाच्या जन्मानंतरचा पहिला तास आणि पहिले सहा महिने हे त्याच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचे टप्पे मानले जातात. ह्या काळात त्याला योग्य पोषण न मिळाल्यास त्याचा सर्वांगीण विकास आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होते. अनेकदा अपुऱ्या पोषणाने मुलं दगावतात. ह्या सर्वांवर आईचे दूध हा एक सोपा सहज उपलब्ध होणारा पर्याय.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बाळाला पहिल्या एक तासाच्या आत सुरवातीला स्रवणारा चिकट पिवळसर घट्ट दूधाचा भाग दिला गेला पाहिजे. त्यानंतर बाळाच्या जन्मापासून ते पहिल्या सहा महिन्यांपर्यंत त्याला फक्त आणि फक्त आईचे दूधच दिले गेले पाहिजे.
मध, चाटण, गुटी, गायीचे दूध, पाणी, किंवा इतर कोणताही आहार या काळात देऊ नये.
आईच्या दुधात बाळाच्या पूर्ण वाढीसाठी आवश्यक सर्व पोषकतत्त्वे, पाणी आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात. त्यामुळे या काळात अन्य कोणत्याही आहाराची गरज नसते. वेळेआधी आहार किंवा पाणी सुरू केल्यास बाळाला जंतुसंसर्ग, जुलाब, कुपोषण यांसारखे धोके वाढतात. त्यातून बाळाच्या जीवितास धोका निर्माण होतो. म्हणूनच पहिले सहा महिने केवळ स्तनपान हे बाळाच्या सुदृढ आयुष्याचा पाया मानले जाते.
बाळासाठी स्तनपानाचे अनेक फायदे असतात जसे की बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्याला जंतुसंसर्ग, जुलाब, न्यूमोनियासारख्या आजारांचा धोका कमी होतो. सोबतच त्याच्या मेंदूच्या व बुद्धीच्या विकासाला चालना मिळते, बाळाचे वजन व उंची योग्य प्रमाणात वाढते, आणि कुपोषणाचा धोका घटतो. स्तनपानाने आई-बाळामधील भावनिक बंध अधिक घट्ट होतो. हा भावनिक धागा आईला नेहमीच सुखावणारा असतो. ह्या भावनिक धाग्यासोबतच स्तनपानाने आईला प्रसूतीनंतरच्या रक्तस्रावाचा धोका कमी होतो. आपल्याकडे आजही अनेक स्त्रिया प्रसूतीपश्यात होणाऱ्या ह्या स्रावाने दगवतात. बाळाला स्तनपान दिल्याने स्त्रीचे गर्भाशय लवकर पूर्वस्थितीत येण्यास मदत होते, त्यासोबत प्रसूतीनंतरचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. स्तनांचा व गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका स्तनपान देणाऱ्या मातांमध्ये कमी होतो.
अनेक फायदे माहिती असूनही नवमाता मात्र एका सावटाखाली जगत असतात. प्रसूतीनंतरचा काळ हा शारीरिक व मानसिकदृष्ट्या नाजूक असतो. या काळात नवमातेला सर्वांत जास्त गरज असते ती आपुलकीच्या आधाराची. पतीने आणि घरातील इतर सदस्यांनी बाळाच्या इतर जबाबदाऱ्या उचलून (जसे की झोपवणे, कपडे बदलणे) आईला विश्रांतीसाठी वेळ द्यावा. सासू, आई किंवा घरातील ज्येष्ठ महिलांनी अनुभवाचा आधार देताना जुन्या गैरसमजांऐवजी शास्त्रीय माहितीवर भर द्यावा — उदा. 'सुरुवातीचे घट्ट पिवळे दूध (चीक) फेकून द्यावे' हा गैरसमज पूर्णतः चुकीचा आहे; हेच दूध बाळासाठी सर्वांत पौष्टिक असते.
घरातील ताणतणाव, टीका किंवा तुलना टाळून आईला धीर देणे, तिचा आत्मविश्वास वाढवणे आणि तिला पुरेशी झोप व सकस आहार मिळेल याची काळजी घेणे ही संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे.
जसा कुटुंबाचा आधार गरजेचा असतो तसेच आरोग्य यंत्रणाचा आधारही महत्वाचा असतो. प्रसूतीनंतर पहिल्या तासाभरातच बाळाला स्तनपान सुरू करून देणे, आई-बाळाला संपर्कात ठेवणे, कांगारू केअर सारख्या सुविधांचा कमी वजनाच्या बाळांमध्ये उपयोग करणे, यासाठी रुग्णालयांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य केंद्रांतील परिचारिकांनी गरोदरपणापासूनच मातांना स्तनपानाविषयी योग्य समुपदेशन द्यावे, स्तनपानाची योग्य पद्धत (लॅच), दूध कमी पडल्यासारखे वाटल्यास काय करावे, आणि अडचणी आल्यास कोणाशी संपर्क साधावा याबाबत मार्गदर्शन करावे. ग्रामीण व आदिवासी भागांत सांस्कृतिक रूढी आणि गैरसमजांमुळे अनेकदा स्तनपानात अडथळे येतात; अशा भागांत स्थानिक भाषेत व सुलभ पद्धतीने जनजागृती करणे अधिक परिणामकारक ठरते.

*मातांच्या मनात असणारे सामान्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे*

प्रश्न: माझे दूध पुरेसे येत नाही असे वाटते, काय करावे?
उत्तर: बहुतांश वेळा हा फक्त गैरसमज असतो. बाळाला वारंवार व योग्य पद्धतीने स्तनपान दिल्यास दुधाचे प्रमाण नैसर्गिकरित्या वाढते. आईने पुरेसे पाणी, सकस आहार आणि विश्रांती घ्यावी. काळजी वाटल्यास डॉक्टर किंवा स्तनपान समुपदेशकाचा सल्ला घ्यावा, स्वतःहून वरचे दूध किंवा फॉर्म्युला सुरू करू नये.
प्रश्न: स्तनपान करताना खूप वेदना होतात, हे सामान्य आहे का?
उत्तर: सुरुवातीचे काही दिवस हलकीशी संवेदनशीलता असू शकते, पण सतत तीव्र वेदना होणे हे बाळाचे 'लॅच' (तोंडाची पकड) योग्य नसल्याचे लक्षण असू शकते. यासाठी त्वरित आरोग्य कर्मचारी किंवा स्तनपान समुपदेशकाची मदत घ्यावी.
प्रश्न: मी नोकरी करते, सहा महिने केवळ स्तनपान कसे शक्य आहे?
उत्तर: काम सुरू करण्यापूर्वी दूध काढून साठवण्याचा सराव करावा. स्वच्छ पद्धतीने काढलेले दूध फ्रीजमध्ये सुरक्षित ठेवता येते व घरी बाळाला दिले जाऊ शकते. शक्य असल्यास कार्यालयातून स्तनपानासाठी सुट्टी किंवा वेळ घ्यावा.
प्रश्न: आईला किंवा बाळाला सर्दी-खोकला झाल्यास स्तनपान बंद करावे का?
उत्तर: नाही. उलट अशावेळी स्तनपान अधिक महत्त्वाचे ठरते, कारण आईच्या दुधातील प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक बाळाला आजारातून लवकर बरे होण्यास मदत करतात. आजारपणात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्तनपान बंद करू नये.
प्रश्न: आईला औषधोपचार सुरू असल्यास स्तनपान चालू ठेवता येते का?
उत्तर: बहुतांश सर्वसामान्य औषधे स्तनपान करणाऱ्या मातांसाठी सुरक्षित असतात. मात्र कोणतेही औषध सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांना आपण स्तनपान करत असल्याचे आवर्जून सांगावे, जेणेकरून योग्य व सुरक्षित औषध निवडता येईल.
स्तनपान हा केवळ आई आणि बाळामधील नैसर्गिक बंध नसून, तो एक सशक्त पिढी घडवण्याचा पाया आहे.
स्तनपानाचा विषय तसा खूप खोल आहे आणि अतिमहत्त्वपूर्णही आहे. ह्या स्तनपान सप्ताहाचे निमित्त साधून ह्या खूप गहन अश्या विषयावर ही संक्षिप्त माहिती देण्याचा प्रयत्न.

- डॉ माधुरी मिसाळ (बीडीएस, सीसीआइडी, एमपीएच, पीएचडी स्कॉलर)

2 months ago (edited) |[YT] | 11

Vishwa Vishal NEWS

“वयोवृद्ध दाम्पत्याला लक्ष करून त्यांना लुटणारे आरोपी 24 तासात जेरबंद...
दोन आरोपी मुद्देमालासह ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांची उल्लेखनीय कारवाई.”
वयोवृद्ध दाम्पत्याला लक्ष्य करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या कारवाईत 02 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ₹36,000 किमतीचे मनी मंगळसूत्र व OPPO कंपनीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी आणखी एका चोरीच्या गुन्हयाची कबुली दिल्याने एकूण दोन गुन्हयांची उकल झाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी कासार व पथक यांनी त्यांना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलीस स्टेशन शिराढोण गु.र.नं. 162/2026 | मधील आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपींनी सदर गुन्हयासह पोलीस स्टेशन भूम गु.र.नं. 423/2026 या मोटार सायकल चोरीच्या गुन्हयाचीही कबुली दिली.
या कारवाईत शिवराम उर्फ बेवड्या धनाजी पवार (वय 21) रा लक्ष्मी पारधी पेढी, तेरखेडा व | आकाश उर्फ बबलू दादाराव पवार (वय 19) रा. मोहा पारधी पेढी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या आणखी एका साथीदाराचा सहभाग निष्पन्न झाला आहे. आरोपींकडून मनी मंगळसूत्र व OPPO कंपनीचा मोबाईल असा ₹36,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना पोलीस स्टेशन शिराढोण यांच्या ताब्यात | देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई श्रीमती रितू खोखर, पोलीस अधीक्षक, धाराशिव व श्री सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक, धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि. सुदर्शन कासार, पोह. शौकत पठाण, पोह. प्रकाश औताडे, पोह. जावेद काझी, पोह. फरहान पठाण, चापोह. नागनाथ गुरव, चापोह. रत्नदीप डोंगरे तसेच QRT पथक, धाराशिव यांनी संयुक्तरीत्या पार पाडली. (सोबत छायाचित्रे जोडले आहे.)

2 months ago |[YT] | 1

Vishwa Vishal NEWS

श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात हरवलेले पॉकेट भाविक महिलेला सुरक्षितपणे परत

श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात दि. 26.07.2026 रोजी SISPL सुरक्षा निरीक्षक श्री. योगेश फडके यांना एक पॉकेट सापडले. त्यांनी तत्परता व प्रामाणिकपणा दाखवत ते पॉकेट मंदिर संस्थानच्या कंट्रोल रूममध्ये जमा केले.
पॉकेटची पडताळणी केली असता त्यामध्ये ₹8,812/- रोख रक्कम तसेच एक पेन ड्राइव्ह व काही महत्वाची कागदपत्रे असल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित भाविक महिलेची ओळख व खात्री करून सदर पॉकेट त्यांना सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले.
सदर भाविक महिलेचे नाव दुर्गाराणी असून त्या आंध्र प्रदेश येथील रहिवासी आहेत. हरवलेले पॉकेट व त्यातील सर्व साहित्य सुरक्षितपणे परत मिळाल्याने त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तसेच सुरक्षा विभागाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

2 months ago |[YT] | 2

Vishwa Vishal NEWS

एस.टी. भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी; परिवहन मंत्र्यांना निवेदन



महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अलीकडेच केलेली एस.टी. बस प्रवास अतिरिक्त 13.5% भाडेवाढ तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांना विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या मार्फत (दि. २४) धाराशिव यांच्या यांच्या वतीने देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, एस.टी. बस ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी जीवनवाहिनी असून, वाढत्या महागाईच्या काळात प्रवास भाड्यात करण्यात आलेली वाढ ही सर्वसामान्यांवर अन्याय करणारी आहे. इंधन, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर आधीच वाढलेले असताना एस.टी. भाडेवाढीमुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी एस.टी. प्रवास भाडेवाढ तात्काळ रद्द करणे, विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांना अधिक सवलती देणे, ग्रामीण भागातील एस.टी. सेवा अधिक नियमित, सुरक्षित व दर्जेदार करणे तसेच भविष्यात कोणतीही भाडेवाढ करण्यापूर्वी जनतेच्या हिताचा विचार करून संबंधित घटकांशी चर्चा करणे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश इंद्रसिंह राजेनिंबाळकर, प्रशांत पाटील,जावेद काझी,अभिषेक बागल,संकेत पडवळ, मोइब पठाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

2 months ago |[YT] | 1

Vishwa Vishal NEWS

पत्रकार लोंढे यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी

धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - साप्ताहिक खडतर प्रवासचे संपादक प्रभाकर लोंढे आणि कॅमेरामन यांच्यावर परंडा पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई म्हणजे पत्रकारिता व चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करणारा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे. त्यामुळे लोंढे यांच्यावर केलेली कारवाई तात्काळ रद्द करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, परंडा तालुक्यातील निजाम जवळा येथील शेतकरी बाबुशा सुपनास पवार यांच्या शेतातील शेड पाडण्यात आल्याच्या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार प्रभाकर लोंढे आणि कॅमेरामन अण्णाभाऊ लोंढे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा. तसेच प्रभाकर लोंढे व अण्णाभाऊ लोंढे हे केवळ बातमी संकलन व वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्यासाठी घटनास्थळी गेले होते. मात्र, "शासकीय कामात अडथळा निर्माण केला" या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून जनहिताच्या विषयांवर माहिती संकलित करून ती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात. त्यामुळे केवळ वृत्तांकनासाठी घटनास्थळी उपस्थित राहणे किंवा चित्रीकरण करणे, याचा अर्थ शासकीय कामात अडथळा निर्माण करणे असा होऊ शकत नाही.
या प्रकरणातील कारवाई अन्यायकारक असून ती पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याची भावना पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून लोंढे यांच्या विरोधातील गुन्हा तात्काळ मागे घ्यावा. तसेच पत्रकारांना कर्तव्य बजावताना अनावश्यक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी केली आहे.
यावर व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, सरचिटणीस आकाश नरोटे, धाराशिव तालुकाध्यक्ष कुंदन शिंदे, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष जुबेर शेख, प्रसिद्ध प्रमुख अल्ताफ शेख, सलीम पठाण, माजी तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, सचिन वाघमारे, असिफ मुलाणी, किशोर माळी, ज्योतिराम निमसे, राजू गंगावणे, मुस्तफा पठाण, प्रभाकर लोंढे, प्रकाश लोंढे, कैलास चौधरी, किरण कांबळे, सज्जन यादव, बाळासाहेब माने, उपेंद्र कटके आदींच्या सह्या आहेत.

2 months ago |[YT] | 2

Vishwa Vishal NEWS

“स्कॉडा कार मधील रोख रक्कम चोरणारा आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड.”



स्थानिक गुन्हे शाखा : फिर्यादी नामे-नागराज सदानंद मडीवाळ, वय 29 वर्षे, रा. चिंचवाडा गाव पाली ता. बिचोली नॉर्थ जि. नॉर्थ गोवा यांचे स्कॉडा स्लाविया कार क्र जीए 04 ई 9156 मध्ये पर्स मधील रोख रक्कम 1,50,000₹ व कागदपत्रे हे दि.19.07.2026 रोजी 11.30 ते 18.00 वा. सु. घाटशिळ पार्कींग येथे स्माशानभुमी रोडवर इदगाह जवळ तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने गाडीचा डाव्या बाजूचा काच फोडून चोरुन नेले होते. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नागराज मडीवाळ यांनी दि.19.07.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

सदर गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार व पोलीस निरीक्षक श्री. मांजरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अमोल निंबाळकर, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे यांच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील-मनोज महादेव धोत्रे, रा. वेताळ नगर तुळजापूर यास ताब्यात घेउन त्याचे कडे चौकशी केली असता त्यांनी सदरचे गुन्हे केल्याची कबुल करुन त्याने चोरी केलेला मुद्देमालापैकी काही मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला. असुन सदरचा पंचनामा पोलीस ठाणे तुळजापूर येथील पोलीस उप निरीक्षक श्री थोटे यांनी केला. नमुद आरोपीस पोलीस ठाणे तुळजापूर येथे हजर केले आहे.

2 months ago |[YT] | 2

Vishwa Vishal NEWS

वैद्यकीय व्यवसाय आणि नवीन येणारे डॉक्टर्स.....🤝

अलीकडं बाहेर पडलेल्या बहुतांश डॉक्टर्स साठी खरं तर नाहीचंय, उलट पेशंट्स मिळणं मुश्किल झालंय.त्यात तुम्ही स्पेशालिस्ट / सुपर स्पेशालिस्ट असाल तर आणखी अवघड आहे. पिताजींचा पैसा असेल तरच निभावून नेता येतं, नाहीतर मग कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन होण्याशिवाय पर्याय नाही..

सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सना तर कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन व्हावंच लागतं, कारण त्यांना लागणाऱ्या मशिनरीज ची कोटीतली इन्व्हेस्टमेंट ते सुरुवातीला करूच शकत नाहीत.. मग हेच कॉर्पोरेट हॉस्पिटल्स डॉक्टरांना नोकरीवर ठेऊन खोऱ्यानं ओढताहेत.. खोर आता तिकडे शिफ्ट झालाय, असं आपण म्हणू शकतो..

म्हणून तर बडे उद्योगपती आणि उद्योगसमूह आता हेल्थकेअर सेक्टर मध्ये उतरू लागलेत. फार्मा कंपन्या आणि इन्शुरन्स कंपन्यांची चलती सुरू आहे.. गेल्या दहा वर्षात हा बदल इतक्या झपाट्यानं झालाय की पुढच्या दहा वर्षात परिस्थिती काय असू शकते हे आपण इमॅजिनच नाही करू शकत!!

'डॉक्टर तुमच्या हातात आमचा पेशन्ट दिलाय, तुम्ही प्रयत्न करा, बाकीचं आमचं नशीब' असं म्हणणारे नातेवाईक आता उरले नाहीत.. एखादी केस हँडल करत असताना तुम्हाला होणारा स्ट्रेस, आणि तो पेशन्ट बरा झाल्यावर तुम्हाला मिळणारं समाधान, याचं गुणोत्तर व्यस्त झालंय.

त्यातच 'मग डॉक्टरनं काय फुकट केलं काय?' अशा पद्धतीची सर्टिफिकेटस् तुमचा सगळा उत्साह पहिल्या एक दोन वर्षातच घालवतात.क्रिटिकल केअर मधल्या डॉक्टर्सचं morbidity आणि mortality चं प्रमाण तर लक्षणीयरित्या वाढलंय.. हे इमर्जन्सी हँडल करणारे डॉक्टर्स तर रोज खूप मानसिक थकतात.. किंवा मग लवकर त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतात, किंवा काही दिवसांनी क्रिटिकल पेशंट्स घेणे बंद करतात, किंवा खूप साऱ्या व्याधी स्वतःला घेऊन लवकर मरतात..

सर्वसामान्य लोकांना त्याची कल्पना येणं शक्यच नाही.. खूप प्रयत्न चालू असलेल्या पेशंटच्या साधं लॅब टेस्ट जरी आपल्या मनासारख्या आल्या नाहीत तरी मन बेचैन होतं.बेडवर शांत झोपलेल्या पेशंटची दोन सेकंद पल्स जरी लागली नाही , तर अंगात जी भयाची वीज चमकून जाते त्याची काय किंमत पैशात होईल का?

साईडरूम मध्ये गाढ झोपलेलं असतानाही मॉनिटरच्या अगदी छोट्याश्या अलार्म ने पण जाग येते, आणि दिवसभरात जो थोडा थोडा "ऍड्रेनॅलीन सर्ज" होत राहतो, आणि शरीरावर विपरीत परिणाम करत राहतो, त्याची भरपाई पैशांत होऊच शकत नाही..

डॉक्टर स्त्रिया तर जास्तच भावनिक असतात. नवरा पण डॉक्टर असेल तर तो तिचे ताण समजू तरी शकतो, पण नॉनमेडीको व्यक्तीला तिचे ऑन-कॉल त्रास देतात, इमर्जन्सीज नकोसे वाटतात, मूड स्विंगज् टॉलरेट होत नाहीत..

पण जिथं 'हॅप्पीनेस इंडेक्स'ला खूपच जपलं जातं, तिथं हे असं अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीचा अभ्यासक्रम शिकण्यात आयुष्याची बारा पंधरा वर्षे घालवायची, प्रत्येक पेशन्ट ट्रीट करताना अथवा ऑपरेशन करताना मरणाचा स्ट्रेस घ्यायचा, ऑन कॉल्स इमर्जन्सीज ह्यात स्वतःचं आयुष्य बेभरवशाचं करून घ्यायचं, कौटुंबिक आणि वैवाहिक सुखाची वाताहत करायची, स्वतःचा आनंद बाजूला ठेवून मन मारून जगायचं, हे असलं आयुष्य कोणाला आवडणार आहे बरं?

हॉस्पिटलमधल्या दुःखमय आणि निगेटिव्ह वातावरणात दिवसभर वावरून देखील तिथल्या कुठल्याच स्ट्रेस चं प्रतिबिंब घरात पडू न देणं, आणि घरच्या प्रापंचिक गोष्टी हॉस्पिटलमध्ये येऊ न देणं यासाठी प्रत्येक डॉक्टर झगडत असतो. कारण डॉक्टर हा सुद्धा एक माणूसच आहे..

एक बटन दाबलं आणि 'मूड चेंज' केला, असं होत नाही.. आणि ते सोपंही नाही.मग 'भावनिक फरफट' होत राहते.. त्यामुळं हळव्या स्वभावाच्या माणसाचे तर अजूनच हाल होतात.. स्थितप्रज्ञता ही गोष्ट प्रत्येकालाच जमेल असं नाही आणि ती प्रत्येकवेळी जमेल असंही नाही..
असो..

पण डॉक्टरच्या हातात कोणाच्यातरी जीवन-मरणाचा प्रश्न रोजच असतो.. एखाद्याचा जीव वाचवणे यासारखे 'नोबल' काम आणि त्यातून मिळणारा आनंद कुठलाच नाही.. पण कॉम्प्लिकेशन्स झाले तर मात्र तुमचं काही खरं नाही,

एखाद्या डॉक्टरच्या हातून किती लोक मरणाच्या दारातून बरे होऊन गेले यापेक्षा, दगवलेला एखादा रुग्ण डॉक्टरची आतापर्यंतची सगळी प्रॅक्टिस, मेहनत आणि नाव पाण्यात घालवू शकते.. आणि तेही, ज्या गोष्टी डॉक्टरच्या हातात नाहीत त्यासाठी.कॉम्प्लिकेशन्स हे कधीही होऊ शकतात, बऱ्याचदा ते डॉक्टरच्याही हातात नसते.

तेच म्हणायचंय की डॉक्टर झाल्यावर आपलं लाईफ सेट होईल, पैशांचा पाऊस वगैरे पडेल अशा विचारातून जर कोणी इकडं येणार असेल तर मात्र परिस्थिती आता पूर्वीइतकी गालिचामय उरलेली नाहीये.. बाहेरून कदाचित लक्षात नाही येणार, पण इथंही तुम्हाला संघर्ष अटळ आहे..

कोणीही एखादा जर Highly educated आणि Well qualified असून देखील एक सुखी समाधानी आयुष्य जगू शकणारच नसेल, तर त्याला, "हा एवढा अट्टाहास आपण कशासाठी केला?", हा प्रश्न आयुष्याच्या शेवटी पडण्यापेक्षा सुरुवातीलाच त्याचा विचार केलेला बरा..

शेवटी एकच सांगतो, मुलं खूप संघर्ष करून डॉक्टर होतात खरं.. पण नंतर त्यांना कळतं की खरा संघर्ष तर डॉक्टर झाल्यावरच करावा लागतोय....

2 months ago |[YT] | 0

Vishwa Vishal NEWS

पालकमंत्र्यांना शेतकरी पुत्राची भावनिक साद!

स्वातंत्र्य दिनाचे झेंडावंदन मेडसिंगा येथेच करा; मनोज जाधव यांचे प्रताप सरनाईक यांना सोशल मीडियातून अनोखे निमंत्रण

रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखा उपक्रम; पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

धाराशिव | प्रतिनिधी...

धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मेडसिंगा येथील शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक साद घालत एक अनोखे निमंत्रण दिले आहे. यंदाचा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा मुख्य झेंडावंदन सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी मेडसिंगा गावात आयोजित करून आपल्या हस्ते ध्वजारोहण करावे, अशी त्यांनी विनंती केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

धाराशिव शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेले मेडसिंगा गाव तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघात येते. मात्र, गावातील प्रमुख रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे मनोज जाधव यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त शिक्षक वसंत पाटील आणि ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित लोकप्रतिनिधींकडे रस्त्याच्या प्रश्नाबाबत पाठपुरावा केला. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना न करता केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याचा आरोपही या पोस्टमधून करण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मेडसिंगा येथे येऊन ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहावे, गावातील रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि जिल्हा विकास आराखड्यातून रस्त्याच्या नव्याने बांधकामासाठी निधी मंजूर करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी भावनिक विनंती करण्यात आली आहे.

मनोज जाधव यांच्या या आवाहनामुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. पालकमंत्री या अनोख्या निमंत्रणाचा स्वीकार करून मेडसिंगा येथे ध्वजारोहण करतील का? गावाच्या विकासासाठी ठोस निर्णय घेतील का? याकडे आता जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

धाराशिव जिल्ह्यात एखाद्या सर्वसामान्य गावातून पालकमंत्र्यांना अशा प्रकारे स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदनाचे सार्वजनिक निमंत्रण देण्याची ही कदाचित पहिलीच घटना असल्याने या विषयाची सर्वत्र चर्चा रंगली असून, येत्या स्वातंत्र्य दिनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

2 months ago |[YT] | 2