प्रिय मित्रांनो,
"वामन परुळेकर Vlogs" या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला नेहमी नवनवीन पर्यटन स्थळांची माहिती, मालवणी रेसिपी, कार व्लॉग्स, मोटो व्लॉग्स तसेच रोमांचक रोड ट्रिप्स दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या नजरेतून ही ठिकाणे अनुभवतांना त्यांचा इतिहास, संस्कृती आणि वैशिष्ट्ये जाणून घेण्याची संधी तुम्हाला मिळेल. यासोबतच गावच्या गोड आठवणी ताज्या करण्याबरोबरच निसर्ग संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे हा माझा मुख्य उद्देश आहे.
माझे व्लॉग्स तुम्हाला आवडले तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचा आशीर्वाद आणि साथ सदैव मिळो, हीच अपेक्षा! 🙏
#ratnagiri #vengurla #kolhapur #konkan #konkanvlogs
Waman Parulekar Vlogs
रविवारचा वेंगुर्ला बाजार आणि माझ्या बालपणीच्या आठवणी
लहानपणी आईसोबत रविवारच्या बाजारात जाण्याच्या माझ्या आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत. काळ बदलला, वेंगुर्ला बदलले, बाजाराचे स्वरूप बदलले; पण त्या रविवारच्या सकाळी आणि त्यासोबत जोडलेल्या आठवणी मात्र अजूनही मनाच्या कोपऱ्यात ताज्याच आहेत.
त्या काळी आमचे वास्तव्य गावडेश्वर मंदिराजवळ वाडकर यांच्या घरी होते. साधारण १९८८ ते १९९६ चा तो काळ. आजच्या पिढीला कदाचित कल्पनाही येणार नाही, पण त्या वेळी घरोघरी नळ नव्हते. त्यामुळे रविवारची सकाळ सुरू व्हायची ती पाण्याच्या कार्यक्रमाने.
प्यायचे पाणी भरण्यासाठी आईसोबत कळशी घेऊन समोरच्या नाईक यांच्या विहिरीवर किंवा कधीकधी आरोसकर यांच्या विहिरीवर जावे लागायचे. विहिरीत डोकावून बघण्यातही एक वेगळीच मजा असायची. पाण्यात पोहत असलेली कासवे, कधीकधी दिसणारे साप आणि त्या विहिरीभोवतीचे वातावरण आमच्यासारख्या मुलांसाठी एक वेगळेच आकर्षण होते. पाणी भरायला गेलो तरी अर्धा वेळ पाण्यात डोकावून बघण्यातच जायचा.
इतर वापराच्या पाण्यासाठी म्हादनवाडी जवळ पांगम यांच्या घरासमोर असलेला सार्वजनिक नळ होता. त्याच्या ठराविक वेळा असायच्या. पाणी आले की सगळ्यांची लगबग सुरू व्हायची. एप्रिल-मे महिन्यात पाण्याची टंचाई वाढली की वेंगुर्ला नगरपरिषदेचा टँकर यायचा. त्या टँकरची वाट पाहणे, बादल्या आणि घागरी लावून नंबर लावणे आणि आपला नंबर कधी येतो याची उत्सुकता ही त्या काळातील एक गंमतीदार आठवण आहे.
पाण्याचा कार्यक्रम आटोपला की मग बाबांची सायकल बाहेर काढायची. गवंडळकर यांच्या घरापासून आत भगत यांच्या घरापर्यंतचा साधा रस्ता म्हणजे माझ्यासाठी सायकल शिकण्याचे आणि सायकल चालवण्याचे मैदानच होते. कित्येक रविवार त्या रस्त्यावर सायकल चालवत, मित्रांसोबत खेळत आणि पुन्हा पुन्हा फेऱ्या मारत गेले. थोडा मोठा झालो तसा मयेकरांच्या सायकल स्टोअरमधून रविवारी सकाळीच सायकल भाड्याने घेऊन ठेवायचो, म्हणजे दिवसभर सायकल चालवता यायची.
हे सगळे झाले की मग दूरदर्शनवरील रंगोली पाहण्याचा कार्यक्रम असायचा. रविवार सकाळ म्हणजे एक वेगळेच वातावरण असायचे. घरात निवांतपणा, बाहेर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची लगबग आणि मनात एकच उत्सुकता – आज बाजारात काय काय पाहायला मिळणार? आमचा एक अलिखित नियम होता. चित्रहार सुरू होण्यापूर्वी बाजारातून परत यायचे!
बाजाराला निघण्यापूर्वी गावडेश्वराचे दर्शन हा कार्यक्रम ठरलेलाच असायचा. देवाला नमस्कार करून माणिक चौकातून आमची स्वारी बाजाराच्या दिशेने निघायची. त्या काळातील वेंगुर्ल्याचा रविवारचा बाजार म्हणजे एक वेगळेच जग होते. कोकणी पालेभाज्या, रानभाज्या, कोकम, आगळ, मसाले, पोहे, कोकणी मेवा, विविध खाद्यपदार्थ आणि घरगुती वापराच्या वस्तू यांची रेलचेल असायची.
मार्च, एप्रिल आणि मे महिना म्हणजे आमच्यासाठी सर्वात आवडता काळ. कारण याच दिवसांत बाजारात बोंडू, जांभळे, कलिंगडे, आंबे, करवंदे आणि फणस यांची भरपूर आवक असायची. कधी एकदा हे सगळे घरी आणून खातो असे व्हायचे. हनुमान मूर्तीच्या आसपासचा म्हणजेच क्रॉफर्ड मार्केटचा भाग तर कायमच गजबजलेला असायचा.
तेथील खरेदी आटोपली की पुढचा टप्पा असायचा तृप्ती हॉटेल. तिथून गरमागरम भजी घेतली की आमची पावले आपोआप वेंगुर्ल्याच्या भव्य माशांच्या मार्केटकडे वळायची. त्या वेळी तृप्ती हॉटेलच्या बाजूने आत मासे मार्केटमध्ये जाता यायचे. ब्रिटिशकालीन वास्तुशैली असलेले ते मासे मार्केट म्हणजे वेंगुर्ल्याची एक ओळखच होती. मार्केटचा गजबजाट, ताज्या माशांचा वास, विक्रेत्यांच्या हाका आणि खरेदीसाठी आलेल्या लोकांची गर्दी हे सारे दृश्य आजही डोळ्यासमोर उभे राहते.
मार्केटच्या बाहेर दोन दुकाने आमच्यासारख्या मुलांसाठी विशेष आकर्षणाची होती. एक चणेवाल्याचे आणि दुसरे जोकर बिस्कीट व पाव विकणाऱ्याचे. त्या दुकानांतून काही खरेदी झाली नाही, तर बाजारातील फेरी पूर्ण झाली असे वाटतच नसे.
कधीतरी अगदीच उशीर झाला आणि मासे घेऊन मठ गावात जायचा कार्यक्रम असला, तर रेडकर यांच्या हॉटेलमध्ये उसळ-पाव खायचा योग यायचा. पाव म्हणजे वेंगुर्ला स्पेशल चौकोनी पाव. ती अप्रतिम चव आजही जिभेवर रेंगाळते आहे. बाजाराच्या विरुद्ध बाजूस एक गल्ली होती आणि तिथे चौकोनी पावाची भट्टी होती. तिथे आमची फेरी व्हायचीच. मटण किंवा चिकन असले की हे चौकोनी पाव हवेतच; त्याशिवाय आम्हा वेंगुर्लेकरांना घास उतरायचा नाही.
त्यानंतर सगळी खरेदी झाली की खाली गाडेकर यांच्या दुकानात घरगुती सामानाची खरेदी व्हायची. बाजारातून परतताना माणिक चौकाच्या दिशेने येताना डाव्या हाताला जिलेबी विकणारे आजोबा बसलेले असायचे. त्यांच्या दुकानाजवळ थांबणे हा आमच्या रविवारचा अविभाज्य भाग होता. लहानपणीच्या खाऊच्या अड्ड्यांपैकी तो एक महत्त्वाचा अड्डा होता.
थोडे पुढे माणिक चौकात आबाच्या दुकानातही काही खरेदी व्हायची. त्या दुकानाशी जोडलेली माझी एक खास आठवण म्हणजे पार्ले किस्मी. त्या छोट्याशा गोळीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते.
महिन्यातून एकदा किंवा केस वाढले की तिथेच माणिक चौकात असलेल्या आमच्या सलूनवाल्या काकांकडे जाणे व्हायचे. केस कापून झाले की मग थोडे पुढे नाम्याच्या गिरणीतून दळलेले पीठ घेऊन आम्ही घरी परतायचो. त्या काळातील रविवार म्हणजे केवळ बाजार नव्हता; तो संपूर्ण कुटुंबाचा एक छोटासा उत्सव असायचा.
दुपारी घरी परतल्यावर जेवणाचा बेतही खास असायचा. सुरमई, सरंगा, बांगडा किंवा त्या दिवशी बाजारातून आणलेला एखादा ताजा मासा. मासेभातावर ताव मारत मारत दूरदर्शनवरील चित्रहार पाहायचो आणि नंतर दुपारची निवांत झोप हा कार्यक्रम ठरलेलाच असायचा.
संध्याकाळ झाली की पुन्हा घरात बसून राहणे शक्यच नसायचे. मग बंदरावर फेरफटका, समुद्राच्या वाऱ्याचा आनंद किंवा कॅम्प परिसरात निवांत फिरणे, भेळ खाणे. त्या काळातील वेंगुर्ल्याची ही एक सुंदर परंपरा होती. बंदरावर उभे राहून समुद्राकडे बघत राहणे, येणाऱ्या-जाणाऱ्या बोटी पाहणे आणि मित्रांसोबत गप्पा मारणे हा संध्याकाळचा अविभाज्य भाग होता.
आणि दिवसाचा शेवट? तो तर जवळजवळ ठरलेलाच असायचा. क्वालिटी कोल्ड्रिंकमध्ये जाऊन कॉकटेल खाणे! त्या एका ग्लासमध्ये जणू संपूर्ण रविवारची मजा सामावलेली असायची. आजही त्या कॉकटेलची चव आठवली की रविवारच्या त्या साऱ्या आठवणी एकदम जाग्या होतात.
आज अनेक मोठ्या शहरांतील मॉल्स, सुपरमार्केट्स आणि आधुनिक बाजारपेठा पाहिल्या. पण त्या रविवारच्या वेंगुर्ला बाजाराची सर त्यांना कधीच येऊ शकत नाही. कारण तो केवळ बाजार नव्हता; तो माझ्या बालपणाचा एक अविभाज्य भाग होता. त्या बाजारात खरेदीपेक्षा जास्त मिळायच्या त्या आठवणी, ती माणसे, ते स्वाद आणि ते क्षण.
आजही वेंगुर्ल्यात गेलो आणि रविवार असेल, तर मन नकळत त्या जुन्या वाटांवर फिरायला लागते. गावडेश्वर, नाईकांची विहीर, आरोसकरांची विहीर, म्हादनवाडीचा नळ, माणिक चौक, क्रॉफर्ड मार्केट, मासे मार्केट, जिलेबीवाले आजोबा, आबाचे दुकान, नाम्याची गिरण, बंदर आणि क्वालिटी कोल्ड्रिंक... सगळे पुन्हा एकदा जिवंत होतात.
खरंच, काही बाजार हे फक्त खरेदीसाठी नसतात; ते आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा आठवणींची उधळण करत असतात. माझ्यासाठी वेंगुर्ल्याचा रविवारचा बाजार हा तसाच आहे—बालपणाचा, कुटुंबाचा आणि कोकणाच्या साध्या पण सुंदर जीवनशैलीचा जिवंत दस्तऐवज.
- प्रा. वामन राधाकृष्ण परुळेकर
1 week ago | [YT] | 18
View 2 replies
Waman Parulekar Vlogs
आज घरात साफसफाई करताना अचानक एका जुन्या फाईल मधून १९९७ साली जाहीर झालेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल असलेला तरुण भारत (सिंधुदुर्ग आवृत्ती)चा पेपर हाती लागला. कागद जरा पिवळसर झाला होता, कडा झिजलेल्या होत्या; पण त्या अक्षरांत अजूनही तेच वजन होतं—आठवणींचं, कष्टांचं आणि स्वप्नांचं.
तो पेपर हातात घेताच क्षणभरासाठी मी वर्तमानातून निघून थेट भूतकाळात गेलो. डोळ्यांसमोर उभे राहिले ते दिवस—शाळेची साधी वर्गखोली, खडूचा फळ्यावर उमटणारा आवाज, वहीवर झुकलेलं डोकं, आणि मनात सतत असलेली एकच धडपड—“या परीक्षेत काहीतरी करून दाखवायचं.” आज जशी सुविधा असते किंवा खाजगी क्लासेस असतात तसे तेव्हा नव्हते; तरीही होती ती चिकाटी, प्रामाणिक मेहनत, आई-वडिलांच्या अपेक्षांची शांत पण ठाम सावली आणि सर्वात महत्त्वाचे गेम चेंजर असे माझ्या वडिलांचे म्हणजेच राधाकृष्ण परुळेकर यांचे मार्गदर्शन. नेमका अभ्यास कसा करायचा, स्कॉलरशिप मधील क्लुप्त्या कोणत्या, सूत्र कोणती याचा अचूक अभ्यास त्यांना होता आणि त्यांनी तो माझ्याकडून करवून घेतला.
त्या काळात अभ्यास म्हणजे फक्त पुस्तकं नव्हती; तो एक शिस्तबद्ध जीवनप्रवास होता. लवकर उठणं, ठराविक वेळेला अभ्यास, शाळा-सुट्टीत मित्रांसोबत खेळ आणि संध्याकाळी पुन्हा वही-पुस्तकांत गढलेलं मन. निकालाचा दिवस जवळ आला की घरातली शांतता जरा अधिकच दाट व्हायची. पेपर हातात येईपर्यंत हृदयाची धडधड थांबत नसे.
आणि आज, इतक्या वर्षांनी, तोच निकालाचा पेपर पुन्हा समोर आला. नाव शोधतानाची तीच घाई, तीच हुरहूर, जणू काही वेळ तिथेच थांबला होता. त्या एका कागदाने आठवण करून दिली—यश सहज मिळालं नव्हतं, ते घडवायला किती कष्ट, किती संयम आणि किती विश्वास लागला होता.
हा पेपर म्हणजे फक्त निकाल नाही; तो त्या काळातील संघर्षाचा, स्वप्नांचा आणि स्वतःवर ठेवलेल्या विश्वासाचा जिवंत पुरावा आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात क्षणभर थांबून मागे वळून पाहायला लावणारा, आणि मनात हलकेच सांगणारा—“तो प्रवास कठीण होता, पण त्यानेच आजचा मी घडवला.”
तळटीप- मुद्दाम पूर्ण रिझल्ट देत आहे. कारण अनेकांच्या आठवणी या कागदा सोबत जोडल्या गेलेल्या असतील त्यांना उजाळा मिळेल. एखादे नाव ओळखीचे दिसल्यास त्याला तिला जरूर शेअर करा. धन्यवाद.
wamanparulekar.blogspot.com/2026/06/blog-post_15.h…
1 week ago | [YT] | 8
View 0 replies
Waman Parulekar Vlogs
*शाळा: आयुष्यभर पुरणारी शिदोरी*
अलीकडेच "शाळा" चित्रपट पुन्हा पाहिल्यावर मलाही माझ्या शाळांची आठवण झाली. अनेकवचन यासाठीच की माझे आजोबा, आई-वडील सगळेच प्राथमिक शिक्षक. सुभेदार मेजर पणजोबांनी हातात घेतलेली तलवार खाली ठेवल्यावर आमच्या घराण्यात पुन्हा कुणी ती उचलली नाही; उचलली ती केवळ लेखणीच. त्यामुळे शिक्षण, शाळा, पुस्तके आणि शिक्षक हे आमच्या घराचे अविभाज्य घटक होते.
आई-वडील दोघेही प्राथमिक शिक्षक असल्यामुळे आमची एक प्रकारे भटकी जमातच झाली होती. बदली झाली की शाळा बदलायची. आरवलीत माझी बालवाडी पूर्ण झाली. पुढे उभादांडा शाळा नं. २ मध्ये पहिली ते तिसरी, मठ शाळा नं. १ मध्ये चौथी ते सातवी, जनता विद्यालय तळवडे येथे आठवी ते दहावी, राणी पार्वतीदेवी कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी येथे अकरावी-बारावी, पदवी शिक्षण कुडाळ आणि पदव्युत्तर शिक्षण रत्नागिरी येथे झाले.
आज मागे वळून पाहताना वाटते की प्रत्येक शाळेने मला काहीतरी दिले. प्रत्येक गावाने, प्रत्येक शिक्षकाने आणि प्रत्येक मित्राने माझ्या आयुष्यात एक वेगळा रंग भरला.
शिक्षकांचा मुलगा असल्यामुळे लहानपणापासूनच शाळेच्या जगाशी माझा जवळचा संबंध आला. अनेकदा आईसोबत गट संमेलनांना जाण्याचा योग यायचा. त्या वेळी "बटवडे पत्रक" नावाचा एक शब्द वारंवार कानावर पडायचा. माझ्या बालबुद्धीने त्याचा अर्थ अगदी वेगळाच लावला होता. मला वाटायचे की शिक्षकांनी किती बटाटेवडे खाल्ले याची नोंद ठेवण्यासाठी ते पत्रक असते! आज ते आठवले की हसू येते.
गट संमेलनांमध्ये शिक्षकांना चहा आणि बटाटेवडे दिले जायचे. तिथेच माझी बटाटेवड्याशी पहिली ओळख झाली. एका संमेलनाच्या निमित्ताने आमच्या गावातील प्रसिद्ध वडा विक्रेते आपा खानोलकर यांच्याकडे ऑर्डर देण्यात आली होती. मी तेव्हा चौथीत होतो. फुकटचा कार्यकर्ता असल्यामुळे वडा आणण्याची जबाबदारी माझ्यावर आणि उज्वलावर आली. त्या निमित्ताने आयुष्यात पहिल्यांदा वडा कसा बनतो याची संपूर्ण प्रक्रिया पाहण्याची संधी मिळाली.
आपा काकांचा वडा म्हणजे मठ पंचक्रोशीत एक दंतकथा होती. गरमागरम बटाटेवडा आणि सोबत वेंगुर्ल्याचा चौकोनी पाव – आजही त्या चवीची आठवण जिभेवर रेंगाळते. गणपती आणि मे महिना आला की मुंबईकरांची गर्दी आपा काकांच्या टपरीवर व्हायची. पंधरा-वीस वड्यांच्या ऑर्डर्स निघायच्या. एसटी किंवा ट्रॅव्हल्सने मुंबईला जाणाऱ्या लोकांची "वडा पार्टी" ठरलेली असायची. पुढे शिक्षण, नोकरी आणि भ्रमंतीमुळे अनेक शहरांत गेलो; पण आपा काकांच्या वड्याची चव पुन्हा कुठेच मिळाली नाही. आजही घरी गेलो की मठात थांबून आपा काकांची चौकशी करतो आणि वडा खाल्ल्याशिवाय पुढे जात नाही.
मठ शाळा नं. १ मध्ये असतानाच माझ्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा प्रवास सुरू झाला – कथाकथन आणि निबंधलेखनाचा.
चौथी ते सातवी या काळात मी जवळजवळ प्रत्येक निबंध स्पर्धा आणि कथाकथन स्पर्धेत भाग घेत होतो. लहानपणापासूनच बोलण्याची प्रचंड आवड होती. आमचे शेजारी मुक्तानंद गवंडळकर यांचे वक्तृत्व विलक्षण होते. त्यांचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला. त्यासोबत शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांचे प्रशिक्षण मिळत गेले.
विशेषतः बाबांनी कथाकथन जिवंत कसे करायचे, आवाजात चढ-उतार कसे आणायचे, प्रसंग नाट्यमय कसा करायचा हे शिकवले. आज मी प्राध्यापक आहे, विद्यार्थ्यांसमोर आत्मविश्वासाने उभा राहू शकतो, याचे मोठे श्रेय या बालपणीच्या स्पर्धांना जाते.
आडेली नं. १ शाळेत स्पर्धा असली की माझ्यासाठी ती केवळ स्पर्धा नसायची. सोंसुरकर आणि पेडणेकर यांच्या हॉटेलमध्ये जाऊन शेंगदाणा लाडू खाणे आणि चहा पिणे हेही तितकेच महत्त्वाचे आकर्षण असायचे.
अशोक बोवलेकर पुरस्कृत निबंध स्पर्धा आणि संजय गावडे पुरस्कृत कथाकथन स्पर्धेत मला मिळालेली पुस्तके आजही माझ्या स्मरणात आहेत. महात्मा गांधींवरील पुस्तकामुळे त्यांच्या जीवनकार्याविषयीची उत्सुकता निर्माण झाली. लहानपणी माझे आईचे बाबा, माझे आजोबा वसंत नाईक हे स्वतंत्रता सेनानी होते आणि त्यांचे योगदान हे ऐकून माहीत होते पण त्या पलिकडे जी माहिती होती ती या पुस्तकांमधून मिळाली. पुढे वेंगुर्ला वाचनालयातून आणि शाळेच्या ग्रंथालयातून त्या विषयावर अनेक पुस्तके वाचली. दुसरे पुस्तक होते बिरबल कथांचे. त्या पुस्तकामुळे चातुर्यकथांची आवड निर्माण झाली. आडेली शाळेत बिरबल कथा सादर करून प्रथम क्रमांक मिळवला होता. त्या वेळी मी मठ शाळा नं. १ चे प्रतिनिधित्व करत होतो. तो आनंद शब्दांत सांगता येणार नाही.
या सगळ्या प्रवासात वेंगुर्ला वाचनालयाचाही मोठा वाटा आहे. तळ्याकाठी असलेली ती जुनी इमारत, जुन्या शैलीचे बाक, पेपर वाचणारी मंडळी आणि त्यांच्याकडे कुतूहलाने पाहणारा मी. तेव्हा आई म्हणायची, "मोठा झालास की वाच." तेव्हा वाटायचे, कधी एकदा मोठा होतो आणि त्या वाचनालयात बसून पेपर वाचतो! वेंगुर्ला बाजारातील एका छोट्याशा पुस्तकांच्या दुकानातून घेतलेली बालपुस्तके आजही स्मरणात आहेत.
आठवीत गेलो आणि जनता विद्यालय तळवडेने माझ्या आयुष्यात प्रवेश केला. हे केवळ हायस्कूल नव्हते, तर संस्कृतीचे, मैत्रीचे आणि व्यक्तिमत्त्व घडवणारे एक विद्यापीठच होते. सावंतवाडीहून अर्ध्या तासाच्या अंतरावर तळवडे नावाच एक सुंदर गाव आहे. जबरदस्त सांस्कृतिक आवड असलेलं गाव. येथे बाराही महिने काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम असायचेच. मी त्यावेळी अनेक प्रसिद्ध नाटके याच गावातील रंगमंचावर पाहिली. श्रीमंत गाव. तर अश्या या गावात आमच श्री जनता विद्यालय आहे. शाळेतले ते दिवस आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आमच्या या शाळेत तीन तुकड्या होत्या अ, ब आणि क. मी अ तुकडीतला विद्यार्थी होतो.
पाटकर सर, पेडणेकर सर, मालवणकर सर, पवार सर आणि माने सर यांसारखे शिक्षक लाभणे हे आमचे भाग्य होते. पाटकर सरांनी जगाकडे पाहण्याची दृष्टी दिली. Y2K सारख्या जागतिक घडामोडी आम्हाला त्यांच्यामुळे समजल्या. पेडणेकर सरांनी संघर्ष शिकवला. मराठीतले गुण वाढवण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आजही आठवते. सहामाही परीक्षेत मराठीत केवळ ४८ मार्क्स मिळाल्याच दुःख माझ्यापेक्षा पेडणेकर सरांना जास्त होत. त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल आणि दहावीत मी ७८ गुण मराठीत मिळवले. शिस्त मोडल्यावर मालवणकर सर आणि गणिताच्या पवार सरांच्या हातचा मारही खाल्ला. मार कसला थोबाडीतच मारली होती. सगळ जग हलल्यासारख वाटल होत. पण एकदा मार खाल्ल्यावर पुन्हा शिस्त मोडण्याची हिंमत नाही झाली.
माने सरांनी इतिहास जिवंत करून दाखवला. त्यांच्या शिकवण्यामुळे व्हर्सायच्या तहाची कारणे आजही तोंडपाठ आहेत. इतिहास हा केवळ तारखांचा विषय नसून घटनांच्या मागील विचार समजून घेण्याचा विषय आहे, हे त्यांनी शिकवले.
आमच्या वर्गात तशी इरसाल मुले होती. मला अजूनही आमचा अड्डा आठवतो. शाळा सुरू होण्यापूर्वी सातेरी मंदिर हा आमचा अड्डा असायचा. सायकली फिरवणे, मित्रांची वाट पाहणे, प्रार्थनेला उशीर झाला तर हळूच रांगेत घुसणे – या सगळ्या आठवणी आजही ताज्या आहेत. दुपारच्या सुट्टीत फुटबॉल खेळणे हा तर नित्यक्रम होता. डबा संपवून वाटाणे किंवा फुटाणे खरेदी करायचे आणि मैदानावर धाव घ्यायची. मला आठवतय मी, आनंद, अमित, रोशन, कांता, विवेक आणि आमचे इतर मित्र कधी एकदा मैदानावर जायला मिळतय याची वाट पाहात असायचो.
किस्से अनेक आहेत पण कायम स्मरणात राहण्यासारखा किस्सा म्हणजे आमची शालेय निवडणूक अगदी थाटात असायची. मुख्यमंत्री, क्रीडामंत्री, वर्गमंत्री वगैरे सगळी पद असायची. मीही आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटची निवडणूक याच काळात लढलो. आमच्या शाळेत प्रचारही करणे बंधनकारक होत. अगदी सभा वगैरे सगळ चालायचं. मी क्रीडामंत्री या पदासाठी उभा होतो. तरी ४ उमेदवार रिंगणात होते. त्यात माझी उमेदवारी मजबूत होती. प्रचार सभा घेतली. गंमत म्हणजे माझ्या विरोधी पक्षातील मुलांनी मी काहीतरी आक्षेपार्ह बोललो आहे अशी अफवा पसरवली. ज्यांनी अफवा पसरवली त्यांच्याशी माझी बाचाबाची देखील झाली आणि माझ निवडणूक हरणं नक्की झाल. मतदानाचा दिवस उजाडला. निकाल माझ्यासाठी धक्कादायक होता. मला दोन नंबरची मत मिळाली होती. नियमाप्रमाणे मी उपमंत्री झालो होतो. केवळ दहा मतांनी मी हरलो होतो पण हा एक वेगळाच अनुभव होता. ज्या लोकशाही परंपरेनुसार आपला देश चालतो त्याच बाळकडूच आम्ही प्यायलो होतो.
शाळा म्हटल की लाईन हा विषय आलाच पण त्या वयात ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात. आम्ही एकमेकांना खूप चिडवल लाईनच्या नावावरून. अगदी बापाच्या नावावरुनही चिडवलय. आमच्याकडे बिलीमारो पण होता, बेलदार पण होता आणि टिंग्या पण होता अगदी प्रत्येक शाळेत असतो त्याप्रमाणे. मित्रमंडळींच्या गंमती-जमती, चिडवाचिडवी, मैदानावरील सामने, शिक्षकांचा धाक, मिळालेली पारितोषिके, वाचनालयाची ओढ, स्पर्धांचे दिवस, वडा-पावची चव आणि शाळेचे संस्कार – या सगळ्यांनी मिळून माझ्या आयुष्याची शिदोरी भरली.
शाळा म्हणजे केवळ वर्गखोल्या, फळा आणि परीक्षा नव्हेत. शाळा म्हणजे आयुष्यभर सोबत राहणाऱ्या आठवणी, घडवणारे शिक्षक, साथ देणारे मित्र आणि व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे अनुभव. आज मागे वळून पाहताना जाणवते की शाळेने मला केवळ शिक्षण दिले नाही; तर जगण्याची दृष्टी दिली.
क्रमशः...
पुढील भागात जनता विद्यालय तळवडेतील आणखी काही संस्मरणीय घटना, मित्रमंडळींच्या गमती-जमती, शिक्षकांचे किस्से आणि त्यानंतरच्या कॉलेज जीवनातील अनुभवांवर प्रकाश टाकेन.
- प्रा. वामन राधाकृष्ण परूळेकर
wamanparulekar.blogspot.com/2026/06/blog-post_940.…
1 week ago | [YT] | 8
View 0 replies
Waman Parulekar Vlogs
वेंगुर्ल्याच्या आठवणी: आजीच्या कथांतून उलगडलेला भूतकाळ
नमस्कार मित्रांनो,
अजून एक नवीन लेख घेऊन मी तुमच्या भेटीला आलो आहे. ब्लॉग लेखन मी यापूर्वीही करत होतो; मात्र काही कारणांमुळे मधल्या काळात त्यात खंड पडला. आता पुन्हा एकदा लिखाणाची सुरुवात केली आहे आणि त्या प्रवासाचा एक भाग म्हणून माझे काही लेख मी माझ्या ब्लॉगवर प्रकाशित करत आहे.
अलीकडेच 'गावडेश्वर मंदिर – माझ्या बालपणाच्या अविस्मरणीय आठवणी' आणि 'वेंगुर्ल्याचा चौकोनी पाव, काळ्या वाटाण्याची उसळ आणि माझ्या आठवणी' हे माझे लेख विविध सोशल मीडिया माध्यमांवर आणि ब्लॉगवर प्रकाशित केले होते. त्या लेखांना तुम्ही दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मला मनापासून आनंद झाला. अनेकांनी आपल्या आठवणी शेअर केल्या, काहींनी जुन्या वेंगुर्ल्याबद्दल लिहिण्याची विनंती केली. त्यातूनच या नव्या लेखाचा जन्म झाला.
काही दिवसांपूर्वी मी वेंगुर्ला सफरीवर गेलो होतो. शहरात फेरफटका मारत असताना अचानक माझी गाडी त्या घरासमोरून गेली जिथे आम्ही लहानपणी राहत होतो — वाडकर यांचे घर. क्षणभर गाडी पुढे जात होती, पण मन मात्र अनेक वर्षे मागे गेले होते. त्या घराचा परिसर, आजूबाजूच्या गल्ल्या, मंदिरे, मित्रमंडळी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माझी आजी जनाबाई यांची आठवण मनात दाटून आली.
आजी ही माझ्यासाठी केवळ घरातील ज्येष्ठ व्यक्ती नव्हती, तर ती जणू चालते-बोलते इतिहासपुस्तक होती. वेंगुर्ल्यातील जुन्या कथा, लोकांच्या आठवणी, गावातील घडामोडी, स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रसंग आणि आमच्या कुटुंबाच्या स्मृतींचा खजिना तिच्याकडे होता. तिच्या तोंडून ऐकलेल्या अनेक गोष्टी आजही मनात ताज्या आहेत.
त्यापैकीच एक म्हणजे माझे आजोबा, माझ्या आईचे वडील वसंत वासुदेव नाईक, यांच्याबद्दलची आहे. माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. ब्रिटिश राजवटीच्या काळात ते काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. स्वातंत्र्याची चळवळ गावागावांत पोहोचवणे, लोकांना जागृत करणे, देशभक्तीची भावना निर्माण करणे आणि स्वातंत्र्यलढ्याची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे ध्येय होते.
आजी सांगायची की त्या काळात आजसारख्या सुविधा नव्हत्या. वीज नव्हती, रस्त्यांवर दिवे नव्हते आणि वाहतुकीची साधनेही अत्यंत मर्यादित होती. तरीही देशसेवेची जिद्द मात्र अफाट होती.
आजोबांकडे एक अतिशय विश्वासू कुत्रा होता. रात्रीच्या अंधारात गावोगावी जाताना त्या कुत्र्याच्या तोंडात कंदील दिला जाई. आजोबा स्वतः हातात काठी घेऊन चालत असत. विशेषतः रात्रीच्या वेळीच त्यांचे काम अधिक चालत असे. दिवसा ब्रिटिश प्रशासनाच्या नजरेत येण्याचा धोका असे; त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांप्रमाणे तेही रात्रीच्या शांततेत गावोगावी फिरत.
शुभ्र पांढरे धोतर, साधा पोशाख, हातात काठी आणि सोबत कंदील घेऊन चालणारा त्यांचा विश्वासू साथीदार. त्यांचे मित्र म्हणायचे वसंता सारस्वत असलास तरी रात्रीच्या अंधारात राखणदाराचा भास होतो रे. हे चित्र आजी इतक्या जिवंतपणे रंगवायची की ते ऐकताना माझ्या डोळ्यांसमोर तो संपूर्ण काळ उभा राहायचा.
गावागावांत जाऊन पत्रके वाटणे, लोकांशी संवाद साधणे, स्वातंत्र्याची गरज समजावून सांगणे आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनजागृती करणे हे त्यांचे दैनंदिन कार्य होते. त्या कार्यासाठी त्यांना कोणतीही प्रसिद्धी, सन्मान किंवा मोबदला अपेक्षित नव्हता. देश स्वतंत्र व्हावा, एवढीच त्यांची इच्छा होती.
आज त्या काळाकडे मागे वळून पाहताना जाणवते की आपल्या स्वातंत्र्यामागे अशा असंख्य ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांचे योगदान आहे. इतिहासाच्या मोठ्या पुस्तकांमध्ये ज्यांची नावे नसतील, अशा अनेक साध्या माणसांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग देशासाठी अर्पण केला. माझे आजोबा त्यापैकीच एक होते.
मात्र दुर्दैवाने माझ्या आजोबांचे निधन खूप कमी वयात झाले. त्या वेळी माझी आई आणि तिची भावंडे अजून लहान होती. कुटुंबासाठी तो अत्यंत कठीण आणि दुःखद प्रसंग होता. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. परंतु अशा कठीण परिस्थितीतही माझी आजी जनाबाई खंबीरपणे उभी राहिली.
त्या काळात आजच्यासारखा सामाजिक किंवा आर्थिक आधार नव्हता. कुटुंबाकडूनही फारसा पाठिंबा मिळाला नाही. तरीही आजीने हार मानली नाही. आपल्या मुलांना चांगले आयुष्य मिळावे, त्यांचे शिक्षण व्हावे आणि ते स्वाभिमानाने जगावे यासाठी तिने अथक परिश्रम घेतले. कितीही संकटे आली तरी ती कधी खचली नाही. आपल्या जिद्दीने, कष्टाने आणि आत्मविश्वासाने तिने आपल्या मुलांना लहानाचे मोठे केले.
आज जेव्हा त्या काळाचा विचार करतो, तेव्हा तिच्या संघर्षापुढे मन आपोआप नतमस्तक होते. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत तिने ज्या धैर्याने संसार उभा केला, त्याला मी नेहमीच सलाम करतो. माझ्यासाठी जनाबाई आजी ही केवळ आजी नव्हती, तर जिद्द, कष्ट आणि मातृत्व यांचे मूर्तिमंत उदाहरण होती.
आजीच्या आठवणींमधून मला एक वेगळेच वेंगुर्ला पाहायला मिळाले. तिच्या गप्पांमधील वेंगुर्ला आणि माझ्या बालपणीचे वेंगुर्ला यांच्यामध्ये अनेक वर्षांचे अंतर होते. ती ज्या वेंगुर्ल्याचे वर्णन करायची, तेथील माणसे, चालीरीती, सण-उत्सव, बाजारपेठा आणि दैनंदिन जीवन यांचे चित्र खूप वेगळे होते. तिच्या गोष्टी ऐकताना मला जणू काळाच्या प्रवाहात मागे गेल्यासारखे वाटायचे. आमच्या लहानपणी त्या अनेक गोष्टी अस्तित्वात नव्हत्या किंवा बदलून गेल्या होत्या. त्यामुळे आजीच्या आठवणी माझ्यासाठी केवळ कौटुंबिक कथा नव्हत्या, तर जुन्या वेंगुर्ल्याचा एक मौल्यवान इतिहास होत्या.
आजी जनाबाईच्या गोष्टींमध्ये वेंगुर्ल्याइतकाच उल्लेख वारंवार यायचा तो तिच्या माहेरच्या गावाचा – आकेरीचा. आजचे आकेरी हे कुडाळ तालुक्यातील एक शांत आणि सुंदर गाव; पण आजीच्या कथांमधील आकेरी हे माझ्यासाठी एका वेगळ्याच काळाचे प्रवेशद्वार होते.
आकेरी हे तिचे माहेर. त्यामुळे त्या गावाशी तिचे भावनिक नाते होते. गप्पा मारताना, जुन्या आठवणी सांगताना किंवा एखादा प्रसंग वर्णन करताना आकेरीचा उल्लेख हमखास यायचा. विशेषतः आकेरीहून वेंगुर्ल्याला कसे येत असत, त्या काळातील प्रवास कसा असे, दळणवळणाची साधने कोणती होती, याबद्दल ती अनेक गोष्टी सांगायची.
आज आपण काही तासांत सहज प्रवास करतो; पण त्या काळातील प्रवास म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. आजी सांगायची की पहाटेच्या अंधुक प्रकाशात बैलगाड्यांचे ताफे घाटातून, सावंतवाडीकडून आणि इतर दूरच्या भागांतून वेंगुर्ल्याकडे निघत असत. त्या बैलगाड्यांना लावलेले घुंगरू दूरवरून ऐकू यायचे. पहाटेच्या शांत वातावरणात तो मंजुळ आवाज घुमत राहायचा आणि अनेक लोकांची जागही त्याने व्हायची.
या बैलगाड्या रिकाम्या नसत. त्यांच्यामध्ये विविध प्रकारचा माल भरलेला असे. काही गाड्या घाटातून किंवा सावंतवाडीकडून माल घेऊन वेंगुर्ला बंदराकडे येत असत, तर काही बंदरातून उतरवलेला माल घेऊन जात असत. त्या काळात वेंगुर्ला हे केवळ एक शहर नव्हते, तर संपूर्ण परिसराचे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते.
आजी सांगायची की त्या काळी घोडागाडी हेही एक प्रतिष्ठेचे वाहन होते. विशेष पाहुणे, अधिकारी किंवा मान्यवर व्यक्ती आल्यास त्यांना आणण्यासाठी घोडागाडी वेंगुर्ला बंदरावर पाठवली जायची. मात्र सर्वसामान्य माणसासाठी चालणे हाच सर्वांत विश्वासार्ह प्रवासाचा मार्ग होता.
"आम्ही बऱ्याचदा चालतच प्रवास करायचो," असे आजी अभिमानाने सांगायची. त्या काळी सायकल हेही दुर्मीळ साधन होते. फार कमी लोकांकडे सायकल असायची. बैलगाडी मिळेलच याची खात्री नसायची. त्यामुळे अनेकजण पहाटे घरातून निघून मैलोनमैल चालत आपला प्रवास पूर्ण करायचे.
प्रवासादरम्यान जेवण किंवा नाश्त्याचीही वेगळी पद्धत होती. वाटेत काही ठराविक घरे असत. तिथे प्रवाशांना जेवण किंवा विश्रांती मिळत असे. त्याची किंमत नेहमी पैशातच दिली जाई असे नाही. अनेकदा तांदूळ, धान्य किंवा इतर आवश्यक वस्तू देऊन त्या सेवांचा मोबदला दिला जायचा. वस्तुविनिमयाची ही पद्धत त्या काळच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग होती. पैशाचा वापर मुख्यतः बाजारपेठांमध्ये आणि मोठ्या व्यवहारांमध्ये होत असे.
आजीच्या आठवणींमधील सर्वात रंगतदार भाग म्हणजे वेंगुर्ला बंदराचे वर्णन. तिच्या मते त्या काळातील वेंगुर्ला बंदर अत्यंत गजबजलेले होते. विविध देशांतील व्यापारी जहाजे, गलबते, होड्या आणि मोठ्या बोटी येथे येत असत. अरब व्यापारीही तिने पाहिल्याचे सांगितले होते. समुद्रमार्गे व्यापार मोठ्या प्रमाणावर चालत असे. प्रवासी वाहतूकही होत असे आणि अनेक वेंगुर्लेकर मुंबईसह इतर ठिकाणी जाण्यासाठी समुद्री मार्गाचा वापर करत असत.
वेंगुर्ल्याच्या माणिक चौकाबद्दलही तिच्या अनेक आठवणी होत्या. तिच्या सांगण्यानुसार त्या ठिकाणी आज जिथे व्यासपीठ आहे, त्या भागात पूर्वी मोठा पाण्याचा हौद होता. त्या हौदाजवळ सार्वजनिक नळ होते आणि अनेक लोक तिथून पाणी भरत असत. या माहितीचा माझ्याकडे कोणताही अधिकृत पुरावा नाही; परंतु आजीकडून आणि इतर काही ज्येष्ठ व्यक्तींकडून मी हे वारंवार ऐकले आहे.
माणिक चौक हा त्या काळात अत्यंत गजबजलेला व्यापारी भाग होता. आज ज्या काही दुकानांची आपल्याला सवय आहे, त्याही आधी तेथे अनेक व्यापारी पेढ्या आणि दुकाने होती, असे आजी सांगायची. विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी-विक्री तिथे होत असे. समुद्रमार्गे आलेला माल आणि घाटातून आलेल्या वस्तू यांची देवाणघेवाण येथे चालत असे.
आजीच्या या गोष्टी ऐकताना मला नेहमी वाटायचे की ती ज्या वेंगुर्ल्याचे वर्णन करत आहे, ते आणि आजचे वेंगुर्ला यांच्यामध्ये जणू अनेक शतके दडली आहेत. तिच्या आठवणींमधील वेंगुर्ला म्हणजे गजबजलेले बंदर, बैलगाड्यांचे ताफे, घुंगरांचा नाद, चालत प्रवास करणारी माणसे, वस्तुविनिमयाची अर्थव्यवस्था आणि समुद्राशी घट्ट जोडलेले जीवन.
आज त्या काळातील बऱ्याच गोष्टी अस्तित्वात नाहीत. रस्ते बदलले, वाहतूक बदलली, बाजारपेठा बदलल्या आणि जीवनशैलीही बदलली. पण आजीच्या कथांमधून जपला गेलेला तो जुना वेंगुर्ला आजही माझ्या मनात तितकाच जिवंत आहे. तिच्या आठवणींमुळेच मला माझ्या गावाचा असा इतिहास समजला, जो कदाचित कोणत्याही इतिहासग्रंथात सापडणार नाही.
आजीच्या स्मृतींच्या या शिदोरीत अजूनही अनेक कथा, अनेक प्रसंग आणि असंख्य आठवणी दडलेल्या आहेत. काळाच्या ओघात त्यांपैकी काही विस्मृतीत गेल्या असतील, तर काही अजूनही मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेल्या आहेत. त्या आठवणी पुन्हा कधी जाग्या झाल्या, एखादा प्रसंग आठवला किंवा आजीच्या गप्पांमधला एखादा धागा सापडला, तर त्या नक्कीच लेखरूपाने तुमच्यापर्यंत घेऊन येईन. कारण या केवळ माझ्या कुटुंबाच्या आठवणी नाहीत, तर जुन्या वेंगुर्ल्याच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि जीवनशैलीची जपलेली अमूल्य ठेव आहे.
- प्रा. वामन राधाकृष्ण परुळेकर
2 weeks ago | [YT] | 26
View 8 replies
Waman Parulekar Vlogs
वेंगुर्ल्याचा चौकोनी पाव, काळ्या वाटाण्याची उसळ आणि माझ्या आठवणी
आज पुन्हा एकदा वेंगुर्ल्यातील एका खास कोकणी नाश्त्याचा आस्वाद घेण्याचा योग आला. साकवाजवळील महालक्ष्मी हॉटेलमध्ये गरमागरम काळ्या वाटाण्याची उसळ आणि चौकोनी पाव असा नाश्ता केला. सोबत कांदाभजीही होती, त्यामुळे अगदी दुग्धशर्करा योगच जुळून आला!
वेंगुर्ल्यातील चौकोनी पाव ही केवळ एक खाद्यपदार्थाची गोष्ट नाही, तर येथील ओळखीचा आणि परंपरेचा भाग आहे. या पावाची खास चौकोनी रचना, त्याची चव आणि त्यामागील जुनी बेकरी परंपरा यामुळे तो वेंगुर्ल्याची खासियत मानला जातो. काही अभ्यासकांच्या मते वेंगुर्ल्याच्या प्राचीन इतिहासाचा प्रभाव या पावाच्या परंपरेवर दिसून येतो. आजही अनेक पर्यटक खास चौकोनी पाव आणि कोकणी नाश्त्याचा अनुभव घेण्यासाठी वेंगुर्ल्यात येतात.
काळ्या वाटाण्याची उसळ आणि चौकोनी पाव हे कोकणातील एक अप्रतिम खाद्यजोड आहे. विशेषतः सकाळच्या नाश्त्यात या जोडीची सर कुठल्याच आधुनिक फास्ट फूडला येणार नाही. साधे पदार्थ, पण चवीत अफाट श्रीमंती!
हा नाश्ता खाताना मात्र माझे मन नकळत बालपणात जाऊन पोहोचले.
लहानपणी आम्ही वेंगुर्ल्यात राहत असताना रामेश्वर मंदिराजवळ रेडकर यांचे एक छोटेसे हॉटेल होते. बाबांसोबत कधीतरी तिकडे जाण्याचा योग आला की काळ्या वाटाण्याची किंवा हिरव्या वाटाण्याची उसळ, चौकोनी पाव, भजी आणि इतर कोकणी पदार्थ खाण्याची पर्वणीच असायची. विशेषतः संध्याकाळची गरमागरम बटाटा भजी आजही जिभेवर रेंगाळत आहेत.
त्यानंतर मुख्य बाजारपेठेतील तृप्ती हॉटेल हे आमचे आणखी एक आवडते ठिकाण होते. पूर्वस मंदिराजवळ आणि बाजारपेठेतील इतर छोट्या हॉटेलांमध्ये मिळणारी बटाटा भजी, कांदाभजी, आंबोळी-उसळ आणि उसळपाव हा आमच्या बालपणाचा अविभाज्य भाग होता. त्या काळी मोठमोठी रेस्टॉरंट्स नव्हती, पण प्रत्येक हॉटेलची स्वतःची एक वेगळी चव आणि ओळख होती.
मच्छी मार्केटमधील रेडकर यांचे हॉटेलही अशाच आठवणींनी भरलेले आहे. दुपारच्या वेळी तिकडे गेलो की उसळपाव, भजी आणि इतर कोकणी पदार्थांचा आस्वाद घ्यायचो. मच्छी मार्केटचा गजबजाट, बाहेरची वर्दळ आणि आत मिळणारा साधा पण अप्रतिम नाश्ता आजही डोळ्यांसमोर उभा राहतो.
गाडी अड्ड्याकडे जाताना उजव्या बाजूला असलेल्या दुकानातही मी अनेकदा उसळपाव खाल्ला आहे. त्या जागेची चव आणि वातावरण आजही स्मरणात आहे. खरं तर वेंगुर्ल्यात अशा आठवणींशी जोडलेल्या अनेक खाद्यजागा आहेत. मी उल्लेख केलेली ही काही ठिकाणे; पण प्रत्येक वेंगुर्लेकराकडे अशा अनेक कथा आणि आठवणी असतील.
आज महालक्ष्मी रेस्टॉरंटमध्ये बसून काळ्या वाटाण्याची उसळ आणि चौकोनी पाव खाताना त्या सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. बालपणातील हॉटेल्स, बाबांसोबतचे फेरफटके, मित्रांसोबत खाल्लेल्या भज्या, बाजारपेठेतील गजबज आणि वेंगुर्ल्याची खास खाद्यसंस्कृती — सगळं काही पुन्हा एकदा मनात उभं राहिलं.
जर तुम्ही कधी वेंगुर्ल्यात आलात, तर समुद्रकिनारे, मंदिरे आणि निसर्ग पाहाच; पण त्यासोबत काळ्या वाटाण्याची उसळ, चौकोनी पाव आणि गरमागरम कांदाभजी यांचा आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका. कारण वेंगुर्ल्याची खरी चव केवळ पदार्थांमध्ये नाही, तर त्या पदार्थांशी जोडलेल्या आठवणींमध्ये आहे.
- प्रा. वामन राधाकृष्ण परुळेकर
3 weeks ago | [YT] | 33
View 7 replies
Waman Parulekar Vlogs
An evening in Vengurla
3 weeks ago | [YT] | 11
View 0 replies
Waman Parulekar Vlogs
माणिक चौक Vengurla Hostoric Place
4 weeks ago | [YT] | 15
View 2 replies
Waman Parulekar Vlogs
गावडेश्वर मंदिर – माझ्या बालपणाच्या अविस्मरणीय आठवणी
wamanparulekar.blogspot.com/2026/05/blog-post.html…
4 weeks ago | [YT] | 9
View 0 replies
Waman Parulekar Vlogs
HOTEL PAVHNER NEAR KANKAVALI
4 weeks ago | [YT] | 7
View 0 replies
Waman Parulekar Vlogs
Hotel Pavahner Near Kankavali
4 weeks ago | [YT] | 17
View 0 replies
Load more